Sunday, 5 August 2012
भोंदुगिरीला तडाखा
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचे शीर्षक तसे गोंधळात टाकणारे आहे; पण नाटक मात्र विचारांचा गोंधळ मिटवून माणसं जोडते, त्यांना शहाणे करून सोडते हे ते पाहिल्यावर समजते.
शिवाजींनी गनिमांना चकवा दिला. पण आज शिवाजींच्या भक्तगणांनी अन् त्यांच्या अनुयायांनी शिवाजी महाराजांच्या धोरणांना व त्यांच्या विचारांनाच चकवा दिला आहे.
अनेकांनी आपल्या 'मालावर' शिवाजी हा 'ब्रॅण्ड' चिकटवून तो खपवायला सुरुवात केली. यात माल खपला; पण शिवाजींची विचार'मूल्य्र' केव्हाच हरवली गेली.
प्रत्येक जातीने आपापला महापुरुष आपलासा केला. त्याला देव बनविला. त्यामुळे रयतेचा राजा असलेला शिवाजी हा काही लोकांपुरता र्मयादित झाला अन् भूमिगत म्हणजे 'अंडरग्राऊंड' झाला. मुस्लीम, दलित या वर्गाला शिवाजी हा आपला राजा, बहुजनांचा नायक आहे, असे वाटत नाही. कारण त्यांना कधी उलगडून ते सांगितलेच गेले नाही. गोविंद पानसरेंसारख्या विचारवंतांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या माध्यमातून तसा प्रयत्न केला; पण पुस्तक या माध्यमामुळे त्यालाही र्मयादा पडल्या. राजकुमार तांगडे या नव्या दमाच्या नाटककाराने अन् संभाजी भगत या विद्रोही शाहिराने हे अचूकपणे हेरले अन् नाटक हे जनसंवादाचे माध्यम वापरून भीममोहल्ल्यात शिवाजी शोधला. नंदू माधव यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
शीर्षकावरून हे दलित नाटक आहे, असे वाटते. पण दलिततत्त्वाच्या दु:खातूनही बाहेर येत एक सामायिक व बृहत असा आक्रोश हे नाटक करते. शिवाजींच्या सगळ्या भक्तगणाला, त्यांच्या नावे भोंदूगिरी अन् दुकानदारी करणार्यांना, अन् आम्हीच शिवाजीचे वारसदार आहोत ही सरंजामी वृत्ती बाळगणार्यांना हे नाटक जोरदार तडाखे लगावते.
शिवाजींना स्वर्गात घेऊन येताना यमराज त्यांचा विचार पृथ्वीतलावरच ठेवून येतो. त्यामुळे इंद्रदेव यमाला 'सस्पेंड' म्हणजे निलंबित करून पुन्हा शिवाजीचा विचार घेऊन यायला पृथ्वीतलावर पाठवितात. पुढे हे यमराज साडेतीनशे वर्षं शिवाजीच्या विचाराचा शोध घेतात. शिवाजीचा राजमुकूट अनेकांच्या डोक्याला लावून पाहतात; पण त्यांना शिवाजीचा विचार लवकर सापडत नाही. शेवटी भीमनगर मोहल्ल्यात मिलिंद कांबळे या सत्यशोधक शाहिराच्या रूपाने त्यांना हा विचार सापडतो, असे या नाटकाचे कथानक आहे.
अचूक शब्दफेक, ताल, लोकलयी, गोंधळाचा 'फॉर्म' अन् शाहिरी या सर्वांचा मिलाफ असलेले हे प्रायोगिक नाटक प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचे समाधान देताना दिसते. हे नाटक अजून व्यावसायिक बनलेले नाही. संभाजी भगत एकेठिकाणी मुलाखत देताना म्हणाले, गावोगावचे लोक हेच आमच्या नाटकाचे 'प्रोड्यूसर' आहेत. ते खरं आहे. नगरला या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे समाधान झाल्याचे जाणवत नव्हते. पुन्हा नाटक पाहिलं पाहिजे अन् इतर लोकांना दाखविण्यासाठी आपणच ते आयोजित केले पाहिजे, असे बहुतेकांना वाटून गेले. यातच या नाटकाचे यश आहे.
शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या नाटकाला मुस्लिमांनी का यावे? कारण शिवाजी म्हटले की मुस्लिमांचा कोथळा काढणारा राजा ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे. पण या नाटकाच्या प्रेक्षकांत मुस्लीम दिसतात अन् शिवाजीचे हे रूप पाहून धन्य होतात. कारण शिवाजी महाराज मुस्लीम द्वेष्टे नव्हते, तर त्यांच्या दरबारी अनेक महत्त्वाच्या पदांवर मदारी म्हेतर, काजी हैदर, इब्राहीम खान असे मुस्लीम होते. याउलट आज शिवाजीवर हक्क सांगणारे त्यावेळी शिवाजींच्या विरोधात होते हे अकथित सत्य हे नाटक सांगत असतं.
आंबेडकरांच्या पूर्वीही आपल्याला सन्मानाने वागविणारा राजा होता अन् तो आंबेडकरांच्या गुरूचाही गुरू होता हा संदेश हे नाटक भीमसैनिकांपर्यंतही अचूकपणे पोहोचविते. आंबेडकरांनंतर इतका व्यापक विचार प्रथमच एखाद्या कलाकृतीने दिला असावा. शिवाजी म्हणजे कुणाही जाती, धर्माची व पक्ष-संघटनेची 'लिमिटेड प्रॉपर्टी' नाही तर हा बहुजनांचा व रयतेचा राजा आहे, हा संदेश हे नाटक ठासून देते. या कलाकृतीने नुसते शिवाजीच नाहीत तर महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज या सर्वांविषयीचा आदर आणखी वाढतो. शिवाजींची प्रतिमा दुरुस्त होते.
अलीकडच्या काळात खरा शिवाजी सांगणे म्हणजे उच्चवर्णीयांना शिव्या घालणे, असे सूत्रच बनले आहे. या नाटकानेही सत्य सांगितले आहे. तेही आडपडदा न ठेवता परखडपणे; परंतु ते सांगताना कोठेही आकांडतांडव नाही की ब्राह्मण द्वेषाचे उदात्तीकरण नाही. त्यामुळेच या वर्गाचे प्रतिनिधीही हे नाटक मनापासून स्ड
Subscribe to:
Posts (Atom)