अण्णांच्या आंदोलनाचा माध्यमांनी विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाने पार ‘पीपली लाईव्ह’ केला. इलेक्ट्रॉनिक मीडिया पोरकट. हे ‘दांडेकर’ २४ तास अन् बाराही महिने नुसते ‘वाजवा रे वाजवा’चे काम करतात, अशी नाराजी अनेकांनी व्यक्त केली. शरद यादव तर संसदेत म्हणाले ‘यह डिब्बा पहले बंद करो’!
अण्णांचे आंदोलन कव्हर करण्यासाठी राळेगणमध्ये गेलो असता शरद यादवांच्या भाषेतील हा ‘डिब्बा’ भेटला. पद्मावती मंदिराबाहेर ओबी व्हॅन.. मंदिराच्या परिसरात २५/३0 प्रादेशिक व राष्ट्रीय न्यूज चॅनेल्सचे रिपोर्टर, कॅमेरामन, ओबीचे तंत्रज्ञ..असा सुमारे १00 लोकांचा जथ्था..!
मी विक्रांत यादव आयबीएन-सेव्हन राळेगणसिद्धी..मी उमेश कुमावत स्टार न्यूज राळेगण..मी भावना इंडिया टीव्ही राळेगणसे..कुणाचा फोनो सुरू तर कुणाचा पीटूसी..अण्णांच्या लाईव्ह मुलाखती.चॅनलचे प्रमुख संपादक थेट राळेगणमध्ये. जे काही बघत होतो ते अभूतपूर्व. कोअर ग्रुपची मिटिंग झाल्यावर तर अण्णांनी १७ वृत्तवाहिन्यांना सलग १२ तास मुलाखत दिली.
राळेगणसारख्या एका छोट्या गावात ‘मीडिया’ची तोबा गर्दी. मराठी, हिंदी, इंग्रजी असे तीनही भाषेतील चॅनेल्स. ही गर्दी एका दिवसापुरती नाही, तर सलग दहा-पंधरा दिवस थांबून. हे सगळे काही नवीनच होते. माध्यमांनाही अन् या गावालादेखील ! नगर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण देशभरात मीडिया एखाद्या खेड्यात जाऊन लगातार २0-२५ दिवस थांबून आहे, असा बहुधा या देशातील पहिलाच प्रसंग. अण्णा काय करतात हे आपण लाईव्ह पाहिले; पण राळेगणमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींचे लाईव्ह जगही बघण्यासारखे होते.
मी आजतकच्या प्रतिनिधीसोबत गप्पा मारत असताना गावातील एक तरुण पोरगा आला अन् त्याने गणपतीच्या वर्गणीचे पावती पुस्तक पुढे केले. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रिपोर्टरकडून तो वर्गणी जमा करत होता अन् हे लोकही हसतहसत ती देत होते. ही वर्गणी तुमच्याकडून कशासाठी? असा प्रश्न मी पंकज केळकर या रिपोर्टरला विचारला. तेव्हा तो म्हणाला, ‘अण्णा १५ ऑगस्टला दिल्लीत आंदोलनाला गेले अन् आम्ही राळेगणला आलो. तेव्हापासून गावात मुक्कामी आहोत. याच लोकांसोबत जगतोय. सगळा गणपती उत्सव येथेच साजरा केला. म्हणून गावकरी प्रेमापोटी वर्गणी मागताहेत’.
सकाळी लवकर उठायचे अन् राळेगण कव्हर करत भटकायचे. दिल्लीत अण्णांची तब्येत खालावल्यावर इकडे गाव काय म्हटले? अण्णांचे उपोषण थांबल्यावर गावाने काय खाल्ले? अण्णा गावात आल्यावर गाव कसे दिसले? कोण कोण गावात आले? हे सगळे बदल या मंडळींनी टिपले. एवढय़ा सार्या मीडियाला राळेगणमध्ये रहायला जागा मिळणे कठीण होते. काही लोक गावातच भाड्याने खोल्या घेऊन राहिले. राळेगण हे गाव नगर-पुणे महामार्गाला लागून आहे. आंदोलनाच्या काळात या महामार्गातील सर्व लॉज बुक होते ते माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी. स्टुडिओतून निरोप आला की ‘बूम’ हातात धरून ‘राळेगण लाईव्ह’साठी तयार व्हायचे. गावातील छोट्या हॉटेलांमध्ये मिळेल ते खायचे.
सागर दुस्सल अन् रोहित वाकळे या नगरच्या पत्रकारांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या या प्रतिनिधींचेही लाईव्ह जग आपल्या कॅमेरात टिपले आहे. त्यात एक फोटो आहे. एक पत्रकार चक्क आपल्या ओबी व्हॅनच्या आरशात दाढी करतोय. पुढचा अनुभव मजेशीर आहे. दिल्लीवरून फोन आला अन् ‘शेव्हिंग क्रीम’ पुसून हा रिपोर्टर लगेच ‘लाईव्ह’साठी उभा राहिला. राळेगणकरांनाही या मीडियाची इतकी सवय झाली आहे की कॅमेर्यासमोर किती आणि कसे बोलायचे? ‘बाईट’ कसा द्यायचा. हे त्यांना आता कळते.
सुधीर शुक्ला हा मुंबईचा पत्रकार सांगत होता, राळेगणमध्ये फिरून मी काही ‘निगेटीव्ह बातम्या’ही शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला फार काही मिळाले नाही.
शेवटी पत्रकारही समाजाचा घटक आहे. सिव्हिल सोसायटीत जगताना त्यालाही अनेक यातनांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्य माणसांची इथल्या व्यवस्थेबाबत जी चीड आहे ती पत्रकारांच्याही मनात असणार. ते काही आभाळातून टपकलेले नाहीत. पत्रकार तर भ्रष्टाचार जवळून पाहतो. पण बर्याचदा त्याला तो खणून काढता येतोच असेही नाही. भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतरही त्यावर कारवाई होतेच असेही नाही. त्यामुळे पत्रकारांच्या मनात जो एक सुप्त संताप आहे त्याला ‘आऊटलेट’ या आंदोलनाने दिले असणार. म्हणून कदाचित पत्रकारही हे आंदोलन दिवस-रात्र कव्हर करत असावेत, असा एक श्लेष या ‘राळेगण लाईव्ह’मधून काढला जाऊ शकतो.
इतर रिपोर्टिंग अन् अण्णांच्या आंदोलनाचे रिपोर्टिंग यात माध्यमांचे प्रतिनिधीही एक फरक करताना दिसले. ते म्हणाले हा ‘पीपली लाईव्ह’ नाही. हा काही तमाशा नाही. हे जबाबदारीने केलेले ‘लाईव्ह’ आहे. एरवी लोक टीव्हीचा ‘डिब्बा’ एन्जॉय करतात. परंतु आता लोक बाहेर पडू लागले आहेत. म्हणून तर राजकारण्यांची भंबेरी उडाली आहे. कदाचित २४ तास चालणारा मीडिया नसता तर अण्णांचे आंदोलन इतके यशस्वी झाले असते की नाही, हा प्रश्न आहे. पण २४ तास चालणारा मीडिया असतानाही अशा व्यापक आंदोलनांची देशाला गरज भासते, हेही लक्षणीय आहे.
मी मुद्रितमाध्यमांचा प्रतिनिधी म्हणून राळेगणला गेलो होतो. सकाळी गेलो अन् संध्याकाळी परतलो. मला दूरध्वनीवरून बसल्या टेबलवर राळेगण समजून घेणेही शक्य होते. इलेक्ट्रॉनिक मीडियाला ते शक्य नव्हते. मुद्रितमाध्यमांपेक्षा ते या आंदोलनात ‘फिल्ड’वर जास्त वेळ आहेत. त्यांची ही साथ अण्णांनीही मान्य केली आहे.
मस्त. राळेगणसिद्धीमधला माहोल डोळ्यासमोर अगदी LIVE उभा केलास.
ReplyDelete